'मासे' म्हटलं की मांसाहारप्रेमींच्या तोंडाला चटकन पाणी सुटतं. सुरमई, हलवा, पापलेट या महागड्या माशांसह अगदी स्वस्तात मिळणारे लहान मासेदेखील मांसाहारप्रेमी चवीने खातात. तुम्हाला कोणी अमुक अमुक ठिकाणी अतिशय चविष्ट मासे मिळतात, मात्र त्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे, असं सांगितलं तर तुम्ही ते खरेदी कराल? बिहारच्या बांका जिल्ह्यात तब्बल 2 लाखांचे मासे मिळतात...पण हे मासे खायचे नाही बरं का, तर त्यांना फक्त पाहून मन भरायचं. कारण ते केवळ पाहण्यासाठीच बनवलेले असतात. तेही अगदी शुद्ध चांदीत.
जिल्ह्यातील मनिया गावात काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार आले होते. तेव्हापासून या गावाची सर्वत्र मोठी चर्चा आहे. येथील लोक चांदीचे मासे बनवतात. या माशांबाबत सर्वांना माहिती व्हावी यासाठी नितीश कुमार यांच्यासमोर लोकांनी ही कला सादर केली. मग काय, मुख्यमंत्र्यांच्या समाधान यात्रेदरम्यान या माश्यांची प्रचंड चर्चा झाली.
या गावात जवळपास 125 कुटुंब राहतात. त्यापैकी 90 ते 95 कुटुंबांचा उदरनिर्वाह चांदीच्या माशांवर अवलंबून आहे. तेथील लोक म्हणतात, या व्यवसायाला खरी ओळख तेव्हा मिळाली जेव्हा आम्ही नवे जिल्हा दंडाधिकारी अंशुल कुमार यांना भेटून त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे व्यवसाय उत्तम चालण्यात अंशुल कुमार यांचा मोठा वाटा आहे.
महत्त्वाचं म्हणजे याठिकाणी सोनार नाही, तर यदुवंशी समाजातील लोक चांदीचे मासे बनवतात. तेच सोनारांनाही या माशांची विक्री करतात. कारागिरांचा दावा आहे की, हे मासे शुद्ध चांदीत बनवले जात असून त्यांची निर्यात विदेशातही केली जाते. 2 हजार रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंतचे मासे याठिकाणी मिळतात. शिवाय ग्राहकांना हवे तसे मासे बनवून दिले जातात. जेणेकरून त्यांची खरेदी सर्वांना शक्य व्हावी.
धार्मिक शास्त्रानुसार चांदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चांदी शुभ आणि शीतल मानली जाते. त्यामुळे चांदीचा कासव, चांदीचा हत्ती, चांदीचा मासा जवळ बाळगणंदेखील शुभ मानलं जातं.