भारतीय लोक जुगाड करण्यात काही कमी नाही. कुठल्याही अडचणीवर कसा तोडगा काढायचा हे भारतीयांना चांगलंच माहिती आहे. आता विजयवाडा शहरातले अनेक जण चेन्नई हायवेवर दुर्गाम्मा पुलाजवळ असलेल्या आइस्क्रीम थाळी ट्रकला नियमित भेट देत असतात. विशेष म्हणजे, या माणसाने ही टाटाच्या लोकप्रिय नॅनो कारला आइस्क्रीम पार्लरचं रुप दिलं आहे.
इथं मिळणारी वेगवेगळी आइस्क्रीम्स ड्राय फ्रूट्स, सिरप, स्प्रिंकलर आणि दर्जेदार पदार्थांचा वापर करून बनवली जातात आणि वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची असतात. हे एक फिरतं आइस्क्रीम पार्लर असून, हे पार्लर मुन्ना नावाच्या व्यक्तीच्या मालकीचं आहे. मुन्ना रोज संध्याकाळी 5 ते 11:30 या वेळेत हे पार्लर चालवतो.
मुन्नाने नॅनो कारचं रूपांतर आइस्क्रीम पार्लरमध्ये केलं आहे. तो म्हणाला, की `मी उदरनिर्वाहासाठी फ्रीज मेकॅनिक म्हणून काम करतो. जेव्हा मी दिल्लीतल्या एका माणसाची एक गोष्ट पाहिली तेव्हा तसंच आपणही करावं असा विचार माझ्या मनात आला. त्या व्यक्तीने कारचं रूपांतर पार्लरमध्ये केलं होतं.
`या नॅनो आइस्क्रीम पार्लरचं डिझाइन आणि अन्य गोष्टींच्या तयारीसाठी मी दोन लाख रुपये खर्च केले. आता ग्राहक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. माझ्या पार्लरमधल्या आइस्क्रीमने ग्राहकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं असल्याने ग्राहक इथे काही खास कारणांनी ट्रीट देण्यासाठी आवर्जून येतात,` असं मुन्नाने सांगितलं.
मी देखील अधिक कमाई करण्यासाठी असा निर्णय घेतला. यासाठी मी बाजारातून स्वस्त आणि किफायतशीर नॅनो कार खरेदी केली. ती आतल्या बाजूने पूर्णपणे बदलून टाकली आणि आत फ्रीज ठेवला. हा फ्रीज बॅटरीवर चालतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मी कारच्या बाहेर दिवे लावले. त्यानंतर मी आइस्क्रीम विकण्यासाठी योग्य जागा निवडली. आता माझा व्यवसाय चांगला वाढला आहे. मी दिवसाला दोन हजार ते चार हजार रुपये कमावतो. वीकेंडला त्याहून थोडं जास्त उत्पन्न मिळतं.`
डार्क फॉरेस्ट, पिस्ता, बटरस्कॉच, पायनॅपल आणि मँगो फ्लेव्हर्ड आइस्क्रीम मुन्ना विकतो. तसंच ग्राहकांच्या मागणीनुसार विशिष्ट फ्लेव्हर्स एकत्र करूनदेखील दिले जातात. डबल चॉकलेट, कॅरॅमल चॉकलेट, पायनॅपल बटरस्कॉच, डबल डार्क फॉरेस्ट असे फ्लेव्हर्स फूडी ग्राहकांची आवड आणि मागणीनुसार तयार करून दिले जातात. 'आम्हाला हे आइस्क्रीम पार्लर खूप आवडतं. कारण इथे आइस्क्रीम आणि टॉपिंग्जचे अनेक फ्लेव्हर्स उपलब्ध आहेत,' अशी या पार्लरला वारंवार भेट देणाऱ्या ग्राहकांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.