काही प्राणी, पक्षी सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. तर काहींना अशुभ मानलं जातं. वटवाघूळ घरात येणं म्हणजे संकटाची चाहूल मानली जाते. परंतु काहीजणांना मात्र घरात वटवाघूळ आल्याने चांगले अनुभव येतात. अमूल्यच्या घरीही असंच झालं.
ही कथा आहे ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यात राहणाऱ्या अमूल्यच्या कुटुंबाची. अमूल्यच्या घरात मागील 12 वर्षांपासून संकटांवर संकटं येत होती. मात्र जेव्हापासून त्यांच्या घरात एका वटवाघळाचा प्रवेश झाला तेव्हापासून ही सगळी संकटं जणू भुर्र्कन उडाली. ते या वटवाघळाला प्रेमाने 'बादू' असं म्हणतात.
आपलं नशीब आपल्याला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही, हेच खरं. 12 वर्षांपूर्वी बादूची आई त्याला उचलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या पंखांमध्ये तो मावत नव्हता. तरीही ती त्याला उचलत होती. अखेर बादू तिच्या कुशीतून निसटला आणि खाली पडला. तेव्हा अमूल्यने त्याला पकडलं आणि आपल्या घरी आणलं. तेव्हापासून तो त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य झाला.
वटवाघळाला या घराची आता प्रचंड सवय झाली आहे. या कुटुंबातील सर्वांना तो व्यवस्थित ओळखू लागला आहे. त्यांच्यापैकी एकही व्यक्ती आजूबाजूला दिसली नाही की, तो जोरजोरात ओरडतो. त्याला खाण्यासाठी फळं आणि पिण्यासाठी दूध दिलं जातं.
विशेष म्हणजे अमूल्यचं हे शेतकरी कुटुंबही त्याची बाळाप्रमाणे काळजी घेतं. अमूल्य बाजारात गेल्यावर त्याच्यासाठी आठवणीने खाऊ घेऊन येतात. बादूला विशेषतः मिठाई आवडते. त्याचबरोबर अमूल्य यांची मुलगी त्याला रक्षाबंधनाला राखीदेखील बांधते. अशा या अनोख्या पक्षीप्रेमाची आजूबाजूच्या परिसरात मोठी चर्चा आहे.