रशियामध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती 45% पर्यंत वाढल्या आहेत. एवढंच नाही तर, दूरसंचार, वैद्यकीय, ऑटोमोबाईल, कृषी आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या किमतीही झपाट्यानं वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
बीबीसीच्या अहवालानुसार, आर्थिक निर्बंधांमुळे रशियन चलन रुबलचं मूल्य डॉलरच्या तुलनेत 30 टक्क्यांनी खाली आलं. अशा परिस्थितीत, रशियामध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती 45% वाढल्या आहेत. पूर्वी 3,500 रुपयांना मिळणारं किराणा सामान आता 5,100 रुपयांना मिळत आहे.
रशियातील दुधाचे दरही गेल्या दोन आठवड्यांत दुप्पट झाले आहेत. अनेक मॉल्स आणि दुकानांमध्ये लोकांच्या वस्तूंच्या खरेदीवरही बंदी घातली जात असल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
रशिया देखील एक मोठी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ आहे, परंतु निर्बंधांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती देखील 17% वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे लॅपटॉप, ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. फोर्ब्सच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, मॉस्को कॅफेमध्ये वापरल्या जाणार्या काही वस्तूंच्या किंमती 300 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
ऑनलाइन व्यवहारांची सर्वात मोठी संस्था असलेल्या SWIFT मधून हकालपट्टी केल्यानंतर रशियाच्या अर्थव्यवस्थेनं गुडघे टेकले आहेत. सध्या, रशियन चलन डॉलरच्या तुलनेत 112 वर व्यवहार करत आहे.
या कारणास्तव, रिझर्व्ह बँक ऑफ रशियानं 7.65 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. यामुळेच रशियात बँका आणि एटीएमसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
रशियातील व्यवसाय बंद करणाऱ्या कंपन्यांची संख्या 59 वर पोहोचल्याचा दावा रशियन वृत्तपत्र इझ्वेस्टियाने केला आहे. यामध्ये फोक्सवॅगन, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, टोयोटा, मॅकडोनाल्ड, गुगल पे, सॅमसंग पे इत्यादींचा समावेश आहे.