पुस्तके वाचा आणि तुरुंगातून बाहेर या, असेच काहीसे सध्या बोलिव्हियाच्या तुरुंगात सुरू आहे. 45 तुरुंगातील 865 कैद्यांना आजकाल पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. 'बुक्स बिहाइंड बार्स' असे या कार्यक्रमाचे नाव आहे. यामध्ये प्रत्येक कारागृहात कैद्यांसाठी एक लायब्ररी बनवण्यात आली आहे, जिथे ते कथांपासून विज्ञान आणि इतिहासापर्यंतची पुस्तके वाचू शकतात.
आजकाल बोलिव्हियाच्या तुरुंगात कैद्यांच्या हातात पुस्तके दिसत आहेत. प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर त्याची परीक्षा असते. आणि मग त्याचा फायदा त्यांना लवकर सुटका होण्याच्या स्वरुपात प्राप्त होतो. असे काही कैदी आहेत जे वेगाने पुस्तके वाचतात, परंतु सामान्यतः येथील कारागृहातील बहुतेक कैदी फारसे शिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पुस्तके वाचणे हे थोडे वेळखाऊ काम आहे.
कारागृहातील ग्रंथालयांचा इतिहास फार जुना नाही. अमेरिकेत प्रथम 1790 मध्ये कारागृहात लायब्ररी सुरू करण्यात आली होती. आता सर्व राज्य आणि फेडरल कारागृहात एक लायब्ररी आहे, ज्यातून कैदी पुस्तके घेऊन वाचू शकतात. पूर्वी कैद्यांना फक्त धार्मिक पुस्तकेच वाचायला दिली जायची, पण नंतर त्यांना सर्व प्रकारची पुस्तके दिली गेली.