जगभर कोरोनाचा उद्रेक आहे. जगातल्या 190 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेक बड्या देशांना कोरोनाला रोखणं जमलं नाही. मात्र आकाराने लहान असलेल्या सात देशांनी कोरोनाला रोखण्यात मोठं यश मिळवलं आहे.
कोरोनाशी लढण्यात जे सात देश यशस्वी ठरले, त्या सातही देशांच्या प्रमुखपदी महिला आहेत. हे सात देश आहेत जर्मनी, न्युझीलंड, फिनलंड, आईसलंड, नॉर्वे, डेन्मार्क आणि तैवान.
तैवान – चीनच्या जवळ असणाऱ्या या देशाने कोरोनाला रोखल्याने सर्व जगाने त्याची दखल घेतली. पंतप्रधान त्साई इंग-वेन यांनी लॉकडाऊनचा पर्याय न स्वीकारता प्रत्येक ट्रेसिंग, ट्रिटमेंट आणि आयसोलेशनवर भर दिला. सध्या तिथे फक्त 443 रुग्ण आहेत.
जर्मनी – चॅन्सलर आहेत अँजेला मर्केल. कोरोनाचा जगभर उद्रेक असताना मर्केल यांनी अशा उपाय योजना केल्यात की त्यामुळे या देशाचा मृत्यूदर फक्त 1.4 एवढाच राहिला. व्यापक चाचण्या करून त्यांनी रुग्णांवर उपचार केलेत. आज रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
न्यूझिलंड – पंतप्रधान आहेत जेसिंडा आर्डन. या देशानेही कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळवलं. 50 लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझिलंडमध्ये फक्त 1456 रुग्ण असून मृत्यूचं प्रमाणही कमी आहे.
फिनलंड – पंतप्रधान साना मारिन या केवळ 34 वर्षांच्या आहेत. जगातल्या सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. अतिशय वेगाने आणि तडफेने निर्णय घेत त्यांनी कोरोनाचा प्रसार रोखला आणि जगजागृती केली.
आईसलंड – केवल 3.5 लाख लोकसंख्या असलेल्या या चिमुकल्या देशाच्या पंतप्रधान आहेत कातरीन जेकोप्सस्तोतीर. त्यांनी देशातल्या प्रत्येक नागरीकांची कोविड चाचणी केली. आणि बाधितांवर उत्तम उपचार केले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली नाही.
नॉर्वे – पंतप्रधान अर्ना सॉलबर्ग यांनी मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच उपाय योजनांना सुरुवात केली. त्यामुळे लोक घराबाहेर पडले नाहीत. मुलांवरचा ताण कमी करण्यासाठी त्यांनी स्वत: देशभरातल्या मुलांशी संवाद साधला. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात राहिली.
डेन्मार्क - पंतप्रधान मेट्टे फ्रीडरिकसन यांनी देशात मार्चमध्येच लॉकडाऊनची घोषणा केली. सुरुवातीला रुग्णांचा आकडा वाढला. मात्र नंतर तो कमी झाला. इथे 7 हजार रुग्ण असून 370 जणांचा मृत्यू झाला आहे.