यशस्वी जैसवालने कसोटी पदार्पणात पहिल्याच सामन्यात दीडशतक झळकावलं. त्याने सामनावीर पुरस्कारही पटकावला. या सामन्यानंतर वडिलांना फोन कॉल केला तेव्हा त्याला भावना अनावर झाल्या आणि व्हिडीओ कॉलवरच तो रडू लागला.
यशस्वीचे वडील भूपेंद्र यांनी सांगितलं की, कसोटीनंतर सकाळी साडेचार वाजता यशस्वीचा व्हिडीओ कॉल आला. त्याला अश्रू रोखता आले नाही. खूप रडला आणि हा भावुक क्षण होता. माझ्याशी जास्त वेळ बोलू शकला नाही कारण तो खूपच थकला होता. त्याने फक्त इतकंच विचारलं की, तुम्ही आनंदी आहात ना बाबा?
कसोटी पदार्पणात दीडशे पेक्षा जास्त धावा करणारा यशस्वी भारताचा तिसरा फलंदाज आहे. त्याने रोहित शर्मासोबत पहिल्या विकोटसाठी विक्रमी भागिदारीही केली. यशस्वी जैसवालने ३८७ चेंडू खेळत १७१ धावा केल्या.
यशस्वी जैसवाल कसोटी पदार्पणात दीडशे धावा करणारा भारताचा पाचवा सर्वात कमी वयाचा सलामीवीर आहे. त्याने 21 वर्षे 196 दिवस वय असताना ही कामगिरी केली. याशिवाय कसोटी पदार्पणात परदेशात शतक करणारा तो भारताचा सातवा खेळाडू आहे.
यशस्वी जैसवालने मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. यशस्वीने कसोटी पदार्पणात सर्वाधिक चेंडू खेळण्याची कामगिरी केली. जैसवालला पहिल्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आले. यानंतर बोलताना यशस्वी म्हणाला की, पदार्पणातच सामनावीर पुरस्कार मिळणं जबरदस्त आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मला आनंद होतो आहे.