वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर संघाच्या निवडीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची आघाडीची फळी ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर निष्प्रभ ठरली. तर यष्टीरक्षक केएस भरत काही चमक दाखवू शकला नाही. एका बाजुला भारतीय संघात संधी मिळावी म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडू धडपडत आहेत. तर एका खेळाडूने संघात जागा मिळवण्याची संधीच नाकारली आहे. तो क्रिकेटर आहे ऋद्धिमान साहा.
ऋद्धिमान साहाचे नाव तेव्हा चर्चेत आले जेव्हा ईशान किशनने दलीप ट्रॉफीत खेळणार नसल्याचं जाहीर केलं. त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यामुळे हा निर्णय घेतला. इशान किशनच्या निर्णयानंतर त्रिपुराच्या निवड समितीने ईस्ट झोनकडून खेळण्यासाठी ऋद्धिमान साहाशी संपर्क साधला. मात्र त्याने खेळायला स्पष्ट नकार दिला.
ईस्ट झोनचे नेतृत्व भारत ए संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे असणार आहे. या संघात अनुकूल रॉय, शाहबाज अहमद, आकाश दीप आणि मुकेश कुमार हे खेळाडू आहेत.
ऋद्धिमान साहाने भारताकडून अखेरचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध 2021 मध्येे खेळला होता. जवळपास दीड वर्षांपासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. तेव्हा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्या मालिकेत ऋद्धिमान साहाला फारशी चमक दाखवता आली नाही. अखेरच्या कसोटीत त्याने 27 आणि 13 धावा केल्या होत्या. आतापर्यंत 40 कसोटी सामन्यात 1353 धावा त्याने केल्या आहेत.