मेलबर्नमध्ये पाकिस्तानला हरवून टीम इंडिया दाखल झाली आहे ती सिडनीत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि नेदरलँड संघांमध्ये सुपर 12 फेरीची लढत होणार आहे. महत्वाचं म्हणजे सिडनीचं मैदान हे टीम इंडियाच्या एका खेळाडूसाठी खूपच लकी आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी लकी आहे. इथे त्यां आजवर खेळलेल्या प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी बजावली आहे.
विराटनं या ग्राऊंडवर आतापर्यंत 4 इनिंगमध्ये 79 च्या सरासरीनं 236 धावा केल्या आहेत. त्यात 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. तर 85 ही विराटची एससीजी वरची सर्वोत्तम धावसंख्या आहे. इथे त्याचा स्ट्राईक रेटही 146 इतका आहे.
टीम इंडियाही या ग्राऊंडवर यशस्वी ठरली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली आहे. हे चारही सामने भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले होते.
सिडनीचं ग्राऊंड स्पिनर्ससाठी अनुकूल ठरु शकतं. इथे भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल पंड्यानं 36 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.
टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच नेदरलँड आणि भारत आमनेसामने येणार आहेत. याआधी वन डेत उभय संघांमध्ये 2 सामने झाले होते. त्यात दोन्ही वेळा भारतानं बाजी मारली होती.
सुपर 12 फेरीत टीम इंडिया नेदरलँडशिवाय दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि बांगलादेश या संघांशी भिडणार आहे.