आयपीएल 2023 मध्ये शुभमन गिलने जबरदस्त कामगिरी करताना ३ शतकांसह जवळपास ९०० धावा केल्या. टी२० लीगमध्ये ऑरेंज कॅपही त्याने पटकावली. त्यामुळे WTC फायनलमध्ये त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. पण स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर तो फसला. शुभमन गिलच नव्हे तर दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजाराही ग्रीनच्या चेंडूवर असाच बाद झाला.
फायनल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीवर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी होती. मात्र रोहित शर्मा 15 धावा करून तर शुभमन गिल संघाच्या 30 धावा असताना बाद झाला. बोलँडचा आत वळलेला ऑफ स्टम्पवर जाणारा चेंडू त्याला समजला नाही. चेंडूवर फटका न मारता तो सोडून देण्याची चूक गिलला महागात पडली.
शुभमन गिलने स्कॉट बोलँडचा चेंडू सोडून दिला अन् तो बाद झाला. गिलने 15 चेंडूत 13 धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने कसोटीवर पकड घट्ट केली. दुसऱ्या दिवसअखेर भारताची अवस्था 5 बाद 151 अशी होती. अजिंक्य रहाणे 29 तर यष्टीरक्षक केएस भरत 5 धावांवर नाबाद राहिले. भारतीय संघ पहिल्या डावात 318 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताकडून पहिल्या डावात कसोटी स्पेशालिस्ट असणारा चेतेश्वर पुजारा काही खास करू शकला नाही. तो फक्त 14 धावांवर बाद झाला. कॅमेरून ग्रीनच्या आत येणाऱ्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. शुभमन गिलप्रमाणेच त्यालाही हा चेंडू न कळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पुजारानंतर विराट कोहलीसुद्धा 14 धावांवर तंबूत परतला. तर अष्टपैलू रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाच्या पाच गोलंदाजांनी आतापर्यंत प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल. चौथ्या दिवशी शनिवारी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.