वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात आहे. सध्या ३६ वर्षांच्या असलेल्या रोहित शर्माच्या वयाचा उल्लेख करत अनेक दिग्गजांनी कसोटी कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केलंय. त्यातच भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. या दौऱ्यात कसोटी संघाची धुरा त्याच्याकडेच असणार आहे.
दरम्यान, रोहित शर्माला कसोटी संघाचा कर्णधार बनायचे नव्हते अशी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पराभवानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी बीसीसीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना केएल राहुल दक्षिण आफ्रिकेत प्रभावीत करू शकला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांना रोहित शर्माला ही जबाबदारी घेण्याची विनंती करावी लागली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारताला २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर जानेवारी २०२२ मध्ये भारताला त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची होती. या मालिकेत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताचा ३-० असा पराभव झाला. यामुळे केएल राहुलकडे कसोटी कर्णधारपद सोपवलं गेलं नाही.
रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून आतापर्यंत फक्त सात कसोटी सामन्यात नेतृत्व केलंय. यापैकी ४ वेळा विजय तर दोन वेळा पराभव झाला. एक कसोटी ड्रॉ राहिली. विजयाच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने ६८ पैकी ४० कसोटीत विजय मिळवला. तर धोनीने २७ आणि गांगुलीने २१ कसोटी कर्णधार म्हणून जिंकल्या आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटीनंतर भारताची पुढची कसोटी मालिका डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात आहे. त्याआधी भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. यामध्ये संघाचे प्रदर्शन आणि कर्णधाराचेही भविष्य ठरू शकते. तोपर्यंत बीसीसीआय कोणताही मोठा निर्णय़ घेण्याची शक्यता कमी आहे.