इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामाची सुरुवात शुक्रवार ३१ मार्चपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तर सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा पहिला सामना २ एप्रिल रोजी आरसीबीविरुद्ध आहे.
भारताचा क्रिकेटपटू हिटॅमॅन रोहित शर्मा आय़सीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर वर्क लोड मॅनेजमेंटवर लक्ष देत आहे. यंदाच्या आय़पीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून तो ठराविक सामन्यातच खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार संघ व्यवस्थापनाने हा निर्णय रोहित सोबत बोलल्यानंतर घेतल्याचं म्हटलंय.
आयपीएलच्या १६ व्या हंगामात रोहित शर्माच्या जागी त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व सांभाळेल. तर रोहित शर्मा डग आऊटमधून संघाच्या निर्णयात मदत करेल. रोहित शर्माच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकुमार यादव मैदानात नेतृत्व करताना दिसेल.
मुंबई इंडियन्ससाठी गेल्या वर्षीचे आय़पीएल निराशाजनक असं होतं. संघाने सलग ८ सामने गमावले होते आणि गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होते. त्यांनी नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय मिळवला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० या हंगामात मुंबई आयपीएलचे विजेते ठरलीय.