जगातील सर्वोत्तम विकेटकीपर, फिनिशर आणि महान कॅप्टनमध्ये एमएस धोनीची गणना केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं टी-20 वर्ल्ड कप, वन-डे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह तीनही प्रमुख आयसीसी स्पर्धांची विजेतेपदे जिंकली आहेत. धोनीनं त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा चॅम्पियन बनवण्याचा विक्रम केला आहे, तर दोन वेळा चॅम्पियन्स लीगचं विजेतेपदही पटकावलं. टीम इंडियाचा माजी कॅप्टन असलेल्या धोनीला चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2023 साठी 12 कोटींमध्ये रिटेन केलं होतं.
Knowledge.com या वेबसाइटनुसार, 'रांचीचा राजकुमार' धोनी 1070 कोटी रुपयांचा मालक आहे. त्याचे मासिक उत्पन्न चार कोटींहून अधिक आहे तर एका वर्षात तो 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई करतो. त्याला आयपीएलमधून 12 कोटी रुपये मिळतात. तो पुढील वर्षी म्हणजेच आयपीएल 2024 मध्येही खेळताना दिसणार आहे.
महेंद्रसिंह धोनीने वयाच्या 39व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानं 15 ऑगस्ट 2020 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली होती. धोनी सध्या रांचीमध्ये राहतो. धोनीचे रांची आणि मुंबईमध्ये आलिशान बंगले आहेत. त्यानं 2011 मध्ये देहराडूनमध्ये 17 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बंगलाही खरेदी केला होता.
धोनीकडे जगातील अनेक आलिशान गाड्या आहेत. ज्यामध्ये हमर, पोर्श 911, ऑडी, मर्सिडीज, मित्सुबिशी पजेरो, रेंज रोव्हर यांचा समावेश होतो. एवढंच नाही तर त्याच्याकडे हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय, कावासाकी निंजा एच 2, आणि Confederate Hellcat X32 अशा बाईकदेखील आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या मालकीच्या सात लक्झरी वाहनांची किंमत सुमारे 12.5 कोटी रुपये आहे. त्यानं अनेक ठिकाणी सुमारे 620 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे. या शिवाय त्याची टी-20 मॅच फी 2 लाख आहे तर रिटेनर फी 1 कोटी आहे. अशी मिळून त्याची एकूण संपत्ती 1070 कोटी रुपये आहे.
7 जुलै 1981 रोजी रांचीमध्ये जन्मलेला धोनी जाहिरातींमधून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. एका टीव्ही जाहिरातीसाठी तो 3.5 कोटी ते 6 कोटी रुपये आकारतो. धोनीनं रिती स्पोर्ट्स नावाच्या मॅनेजमेंट कंपनीत भागभांडवल खरेदी केलं आहे. त्याची कपडे आणि फुटवेअर ब्रँड कंपनीदेखील आहे. त्यानं फूड बेव्हरेजेसमध्येही गुंतवणूक केली असून, हॉकी व फुटबॉल टीममध्येही त्याची आर्थिक भागीदारी आहे.
महेंद्रसिंग धोनीनं 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून जवळपास 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट त्याच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये धोनीची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने केली होती. धोनीनं या वर्षी 38 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स भरला होता. झारखंड या राज्यातून तो सर्वाधिक कर भरणारी व्यक्ती ठरला आहे. आयकर विभागाच्या मते, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून धोनी हा झारखंडमधून सर्वाधिक कर भरणारा करदाता आहे. त्यानं 2022-23 मध्ये 38 कोटींचा कर भरला होता.
धोनीनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. या पैकी भारतानं 178 सामने जिंकले तर 120 सामन्यांमध्ये पराभव झाला. 13 सामने अनिर्णित राहिले, तर 6 टाय आणि 15 ड्रा झाले.