अर्जेंटिनाचा कॅप्टन लियोनेल मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. फिफा वर्ल्ड कप उंचावण्याची संधी त्याला मिळाली. मेस्सीच्या पत्नीने त्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर भावूक होत पोस्ट शेअर केली होती. आम्हाला माहितीय की इतकी वर्षे तू काय सहन केलंस असं तिने म्हटलं होतं. मेस्सीच्या पत्नीचं नाव एंटोनेला रोकुजो असं असून दोघेही बालपणापासून मित्र होते.
मेस्सी आणि एंटोनेला यांच्या लव्हस्टोरी खास अशी आहे. मेस्सीच्या मित्राच्या घरी दोघांची पहिल्यांदा ओळख वयाच्या ५ व्या वर्षी झाली होती.
अर्जेंटिनात रोसारियोत मेस्सीचं बालपण गेलं. मेस्सी त्याच्या मित्राच्या घरी डीनरला गेला होता तेव्हा मित्राची चुलत बहीण असणाऱ्या एंटोनेलाशी त्याची भेट झाली होती. पण यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी मेस्सी बार्सिलोनाला रहायला गेला.
लियोनेल मेस्सी बार्सिलोनाला गेल्यानतंर दोघांची भेटही झाली नाही. जवळपास २००४ पर्यंत ते एकमेकांपासून दूर होते. पण त्यानतंर एका अपघातामुळे दोघेही पुन्हा जवळ आहे. एंटोनेला रोकुजोच्या जवळच्या मित्राचा कार अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हा मेस्सीने तिला आधार दिला होता.
मेस्सी आणि एंटोनेला यांच्या भेटीगाठी पुन्हा सुरू झाल्या आणि ते मित्र बनले. २००८ पासून मेस्सी आणि एंटोनेला डेट करत होते. तर २००९ मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे माहिती दिली होती.
एंटोनेला आणि मेस्सी यांनी दोन मुलांच्या जन्मानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला तर दुसऱ्या मुलाचा जन्म २०१५ मध्ये झाला. यानंतर त्यांनी २०१७ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर २०१८ मध्येही एका मुलाचा जन्म झाला.
लियोनेल मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो ही एक मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. २०१६ मध्ये तिने रिकी सार्कनीसोबत मॉडेलिंग काँट्रॅक्ट केलं होतं. तर २०१७ मध्ये आपल्या ब्युटिक चेनची सुरुवात केली होती.
एंटोनेलाची संपत्ती २० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १६५ कोटी रुपये इतकी आहे. एंटोनेलाने काही फिटनेस ब्रँडसाठीही काम केलं आहे.