भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हलवर होणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस आधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे फायनलमध्ये खेळू शकणार नाही.
जोश हेजलवूड आयपीएलच्या १६ व्या हंगामापासून दुखापतीचा सामना करत आहे. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघात तो होता. आयपीएल अर्धवट सोडून हेजलवूड मायदेशी परतला होता. विराट आणि हेजलवूड हे चांगले मित्र आहेत. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर विराट आणि हेजलवूड यांचा फोटोही व्हायरल झाला होता.
हेजलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू मायकल नेसरला संधी दिली आहे. नेसर भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्येही खेळू शकतो. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्कॉट बाॅलँडला बाहेर ठेवावं लागेल. आयसीसीने हेजलवूडच्या जागी नेसरला संघात घेण्यासाठी परवानगीही दिली आहे.
मायकल नेसरने नुकतंच इंग्लडमध्ये काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ग्लेमोर्गनकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली होती. पाच सामन्यात १९ विकेट त्याने घेतल्या होत्या. तर ससेक्सविरुद्ध शतकी खेळीही केली होती. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद केलं होतं.
मायकल नेसरने आतापर्यंत फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र नेसर कर्णधार पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कसोबत फायनलसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवू शकतो.
स्कॉट बाॅलँडने ७ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने फेब्रुवारी भारताविरुद्ध चांगली कामगिरी करताना २८ विकेट घेतल्या होत्या. जोश हेजलवूड एशेस मालिकेतील पहिल्या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होईल अशी आशा व्यक्त केली जातेय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एशेस मालिका १६ जूनपासून सुरू होणार आहे.