भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये सुरु असलेल्या कसोटीत शतक झळकावलं. या शतकासह त्याने इतिहास घडवला आहे. तो भारताचा एकमेव असा कर्णधार आहे ज्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केलं आहे. अशी कामगिरी विराट किंवा धोनीलाही जमली नव्हती.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ चेंडूत शतक केलं. यात त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले. रोहित शर्माचं कसोटी कारकिर्दीतलं हे नववं तर घरच्या मैदानावरचं ८वं शतक ठरलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचं हे पहिलंच शतक आहे.
रोहित शर्माच्या आधी महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. पण त्यांना त्यांच्या कार्यकाळात तिन्ही फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करता आली नव्हती.
भारताचे इतर फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर गुडघे टेकत असताना रोहितने एका बाजूने फटकेबाजी करत शतक मारलं. चौकार मारत त्याने शतक झळकावलं. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतलीय.
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध शतक केलं आहे. तर टी२० मध्ये त्याने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शतक केलंय.
कर्णधार म्हणून सर्व फॉरमॅटमध्ये शतक करणारा तो जगातला चौथा फलंदाज बनला आहे. याआधी अशी कामगिरी श्रीलंकेचा तिलकरत्ने दिल्शान, फाफ डुप्लेसिस आणि बाबर आझम यांनी केलीय.
सध्या खेळत असलेल्या खेळाडू्ंमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्यांमध्ये रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आता ४३ शतके आहेत. या यादीत विराट कोहली ७४ शतकांसह पहिल्या स्थानी आहे. तर वॉर्नर (४५) दुसऱ्या आणि जो रूट (४४) तिसऱ्या स्थानी आहेत.