ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक करत ८४ धावा केलेल्या अक्षर पटेलने दुसऱ्या कसोटीतही संघ अडचणीत सापडला असताना महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने केलेल्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघ २६२ धावांपर्यंत मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाला आता पहिल्या डावात फक्त एका धावेची आघाडी मिळाली आहे. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवण्यापासून रोखलं. भारतीय संघाची अवस्था एकवेळ ७ बाद १३९ अशी झाली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती.
रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलने ११४ धावांची मोठी भागिदारी करत भारताची धावसंख्या अडीचशेवर पोहोचवली. ही या सामन्यातली सर्वात मोठी भागिदारी ठरली. अक्षर पटेलने ११५ चेंडुत ७४ धावा केल्या. यात ९ चौकार आणि ३ षटकार मारले. तर अश्विनने ७१ चेंडूत ३७ धावा करताना ४ चौकार मारले.
ऑस्ट्रेलियाने फिरकीपटूंच्या जोरावर भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. नाथन लायनने ५ विकेट घेतल्या. पहिल्या डावात ९ विकेट फिरकीपटूंना मिळाल्या. दिल्लीच्या मैदानात याआधी झालेल्या पाच कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी सर्वाधिक १० विकेट गेल्या आहेत. तर तिसऱ्या दिवशी ८ आणि चौथ्या दिवशी सर्वात कमी ६ विकेट पडल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लवकर गुंडाळावा लागेल.
भारतीय संघाने दिल्लीत ऑस्ट्रेलियाला ३ वेळा कसोटीत हरवलं आहे. १९६९ मध्ये म्हणजे ५४ वर्षांपूर्वी पहिल्या डावात पिछाडीवर राहिल्यानंतरही भारताने ७ विकेटने विजय मिळवला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २९६ तर भारताने २२३ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसऱ्या डावात फक्त १०७ धावाच करता आल्या होत्या. ८ खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नव्हते. फिरकीपट्टू बिशनसिह बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी ५-५ गडी बाद केले होते. आता अक्षर पटेल, अश्विन आणि जडेज्या यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
भारताला तेव्हा १८१ धावांचे आव्हान मिळाले होते. ते आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात गाठलं होतं. ६१ धावात ३ गडी बाद झाल्यानंतर अजित वाडेकर यांच्या नाबाद ९१ आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नाबाद ४४ धावांच्या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला होता.