भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपबद्दल अजूनही वाद सुरू आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वर्ल्ड कपसाठी भारतात टीम पाठवण्याबाबत अजूनही साशंक आहे. पण आयसीसीला मात्र पाकिस्तानची टीम भारतात वर्ल्ड कप खेळेल अशी आशा आहे.
आयसीसीने मंगळवारी 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. तसंच काही टीमविरुद्ध चेन्नई आणि बंगळुरूमध्ये खेळण्याची पीसीबीची मागणीही आयसीसीने फेटाळून लावली आहे. पीसीबी चेन्नईच्या टर्निंग विकेटवर अफगाणिस्तानविरुद्ध आणि बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच न ठेवण्याची विनंती केली होती.
वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर पीसीबीने टीमचं खेळणं सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असल्याचं सांगितलं आहे. वर्ल्ड कपमध्ये आमचं खेळणं, 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये खेळणं तसंच सेमी फायनलला पोहोचलो तर मुंबईत खेळणं सरकारने परवानगी दिली तरच शक्य आहे, असं पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली टीम वर्ल्ड कप खेळेल का नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली आहे, पण आयसीसीला मात्र आशा आहे. सर्व सदस्यांना आपल्या देशाच्या कायद्याचं पालन करावं लागणार आहे, आम्ही त्याचा सन्मान करतो. पण पाकिस्तानची टीम वनडे वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येईल, असा विश्वास आयसीसीच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानने भारतात शेवटची स्पर्धा 2016 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळली होती. दोन्ही देशांमधल्या तणावपूर्ण संबंधांमुळे भारत-पाकिस्तान सामने आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये होतात.