पाकिस्तानचा महान लेगस्पिनर दानिश कनेरिया आता 40 वर्षांचा झाला आहे. त्याने पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामन्यात 261 विकेट घेतल्या आहेत. या शिवाय त्याने 15 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.
दानिश कनेरियाने पाकिस्तानकडून 2000 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 10 वर्ष पाकिस्तानी ड्रेसिंग रूमचा भाग होता. त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 15 वेळा पाच विकेट्स आणि एका सामन्यात दोन वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत.
दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. वसीम अक्रम (414) वकार युनूस (373) आणि इम्रान खान (362) यांनी त्याच्यापेक्षा जास्त कसोटी बळी घेतले आहेत. परंतु हे तिघेही वेगवान गोलंदाज होते.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दोन वर्षांपूर्वी दावा केला होता की दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळं त्याचे काही सहकारी त्याच्यासोबत पक्षपातीपणे वागायचे. त्यामुळं मोठा गदारोळ झाला होता.
शोएब अख्तरने आरोप केला होता की काही पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियासोबत जेवणंही टाळतात. दानिश हिंदू असल्यामुळेच हे सर्व घडल्याचं शोएबचं म्हणणं होतं.
दानिश कनेरियावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला, त्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. 2012 मध्ये दानिश कनेरियावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या सहकाऱ्यांना स्पॉट-फिक्सिंगमध्ये आमिष दाखवल्याबद्दल आजीवन बंदी घातली होती.