ईशान किशन मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा धडाकेबाज फलंदाज आहे. गेल्या आयपीएल लिलावात मुंबईनं ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. टी20 वर्ल्ड कपसाठी बॅक अप विकेट कीपर म्हणून ईशानच्या नावाची चर्चा होती. पण दिनेश कार्तिकनं त्याची जागा घेतली.
आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर देखील वर्ल्ड कपसाठीच्या 15 सदस्यीय टीममध्ये आपली जागा बनवू शकला नाही. श्रेयसला यंदा कोलकात्यानं 12.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. वर्ल्ड कपसाठी श्रेयस स्टँड बाय खेळाडूंमध्ये आहे. त्याची संघातली जागा दीपक हुडानं घेतली आहे.
मुंबईचा शार्दूल ठाकूर गेल्या वर्षी यूएईतल्या वर्ल्ड कप संघात होता. पण यंदा मात्र त्याला भारतीय टी20 वर्ल्ड कप संघात जागा मिळवता आली नाही. आयपीेलच्या मेगा ऑक्शनमध्ये याच शार्दूल ठाकूरला 10.75 कोटी रुपयांची बोली लागली होती. दिल्लीकडून त्यानं 14 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्सचा महत्वाचा शिलेदार म्हणजे दीपक चहर. आयपीेएल ऑक्शनमध्ये चहरसाठी सीएसकेनं तब्बल 15 कोटी रुपये मोजले होते. पण टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप संघात मात्र तो स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत आहे.
लखनौ सुपर जायंट्सनं वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात घेण्यासाठी लिलावात 10 कोटी रुपये खर्च केले होते. गेल्या आयपीएलमध्ये त्यानं 13 मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या. याच कामगिरीच्या जोरावर आवेश खानला भारतीय संघात स्थानही मिळालं. पण वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचं तिकीट काही मिळालं नाही.