आठव्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला रविवार 16 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला क्लालिफाईंग सामने होणार असून त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरु होणार आहेत. दरम्यान टी20 वर्ल्ड कपचा आजवरचा इतिहास पाहिला तर या स्पर्धेत खेळाडूंमध्ये अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यात युवराज आणि फ्लिंटॉफ वादापासून ते शाहीद आफ्रिदीची प्रेस कॉन्फरन्समधली कमेंट अशा गोष्टींची मोठी चर्चा झाली.
टी20 वर्ल्ड कपमध्ये 2007 साली झालेला इंग्लंड आणि भारतीय संघातला सामना इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाला. कारण या सामन्यात युवराजनं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्सर्स ठोकले होते. पण त्या ओव्हरआधी इंग्लंडचा ऑल राऊंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराज यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. पण त्यानंतर जे काय झालं ते अवघ्या जगानं पाहिलं.
खरं तर त्या ओव्हरआधी युवराजनं फ्लिंटॉफला लागोपाठ दोन फोर मारले होते. त्यामुळे फ्लिंटॉफनं युवराजला उकसवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा राग युवराजनं पुढच्याच ओव्हरमध्ये काढला. ब्रॉडला सहावी सिक्स मारल्यानंतर युवराजनं फ्लिंटॉफकडे पाहिलं आणि चांगलाच हसला. त्यावेळी फ्लिंटॉफचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सला शिस्तभंगाच्या कारणास्तव घरी पाठवण्यात आलं होते. ऑस्ट्रेलियाचा हा दिवंगत खेळाडू त्याच्या कारकिर्दीदरम्यान अनेक वादात अडकला होता. त्यानं अनेक नियमांचं उल्लघन केलं होतं. त्यानंतर त्याला या सगळ्या कृतीचा पश्चातापही झाला. पण 2009 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर सायमंडची कारकीर्दही जवळपास संपुष्टात आली.
2010 साली इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यात केव्हिन पीटरसननं मोलाची भूमिका बजावली होती. पीटरसनला त्या वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा किताबही मिळाला होता. पण त्यानंतर 2012 च्या वर्ल्ड कपमध्ये मात्र पीटरसनला इंग्लंड संघातून वगळण्यात आलं. वर्ल्ड कपदरम्यान या गोष्टीची मोठी चर्चा झाली होती.
2016 सालचा टी20 वर्ल्ड कप भारतात खेळवण्यात आला होता. तेव्हा भारत-पाकिस्तान मॅचनंतर पाकिस्तानचा कॅप्टन शाहीद आफ्रिदीनं प्रेस कॉन्फरन्समध्ये एक विधान केलं होतं. आफ्रिदीनं म्हटलं होतं की मला पाकिस्तानपेक्षा भारतीय प्रेक्षकांकडून जास्त प्रेम मिळतं. या कमेंटनंतर आफ्रिदीला पाकिस्तानात पोहोचताच मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं.
2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर बॅट्समन क्विंटन डी कॉकनं एक मोठा वाद उभा केला होता. डी कॉकनं वैयक्तिक कारणास्तव वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली होती. पण त्यानंतर कारण समोर आलं की डी कॉकनं वर्णभेदाच्या निषेधात मैदानात गुडघे टेकून उभं राहणं त्याला पटणारं नाही. त्यामुळे त्यानं सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर त्यानं याबाबत माफी मागितली आणि पुढच्या सामन्यात तो मैदानात उतरला. यूएईमध्ये झालेल्या त्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ वर्णभेदाविरुद्धचा निषेध नोंदवण्यासाठी सामन्याआधी मैदानात गुडघे टेकायचे.