2007 च्या पहिल्याच टी20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेनं चक्क रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाला हरवण्याची कमाल केली होती. ऑस्ट्रेलियाला त्या सामन्यात झिम्बाब्वेनं 5 विकेट्सनी हरवलं आणि क्रिकेट वर्तुळात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये आणखी एक धक्का दिला तो बांगलादेशनं. मोहम्मद अश्रफुलच्या बांगलादेशनं वेस्ट इंडिजनं दिलेलं 165 धावांचं आव्हान 6 विकेट्स आणि तब्बल 2 ओव्हर्स बाकी ठेऊन पार केलं होतं.
2009 साली नेदरलँडच्या संघानं सर्वांना चकित करुन सोडलं. कारण साखळी फेरीत इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला नेदरलँडनं पराभवाचा धक्का दिला. शेवटच्या ओव्हरपर्यंत चाललेल्या त्या सामन्यात नेदरलँडनं इंग्लंडला 4 विकेट्सनी हरवलं.
2014 साली नेदरलँडनं पुन्हा इंग्लंडला दणका दिला. यावेळी ऑईन मॉर्गनच्या इंग्लिश संघाला नेेदरलँडनं तब्बल 45 धावांनी धूळ चारली. इंग्लंडला टी20 वर्ल्ड कपमध्ये आजवर दोन वेळा नेदरलँडनं हरवण्याची कमाल केली आहे.
2014 साली हाँग काँग हा टी20 क्रिकेटमधला नवखा संघ होता. पण याच वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये हाँग काँगनं 2 विकेट्सनी बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला होता.
2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजनं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. पण या स्पर्धेत साखळी फेरीत अफगाणिस्ताननं या बलाढ्य संघाला धूळ चारली होती. अफगाणिस्ताननं दिलेलं 124 धावांचं टारगेट वेस्ट इंडिजला पार करता आलं नाही. विंडीजचा संघ त्या सामन्यात 117 धावाच करु शकला.
यंदाच्या टी20 वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यातच नामिबियानं पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाला हादरवून सोडलं. कारण महिनाभरापूर्वी ज्या श्रीलंकेनं भारत, पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांना हरवलं आणि आशिया कप जिंकला तीच श्रीलंका नामिबियासमोर मात्र ढेर झाली. टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात धक्कादायक निकालामध्ये या सामन्याचीही नोंद झाली.