इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ऍशेसच्या दुसऱ्या टेस्टमध्ये जोरदार राडा झाला आहे. सीरिजच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पर्यावरणवादी आंदोलकांनी धुमाकूळ घातला आहे.
इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ऍशेसच्या दुसऱ्या टेस्टला सुरूवात झाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
मॅचच्या पहिल्याच ओव्हरनंतर दोन आंदोलक मैदानात घुसले आणि त्यांनी मैदानात लाल रंगाची पावडर उधळली. यावेळी खेळाडू आणि आंदोलकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली.
जस्ट स्टॉप ऑईल या समुहातील आंदोलकांनी लॉर्ड्सच्या मैदानात सुरक्षा तोडून हे आंदोलन केलं. युकेमधील नवे तेल लायसन्स रोखण्याची या समुहाची मागणी आहे.
आंदोलकांच्या या गोंधळामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला होता, पण नंतर सुरक्षा रक्षक या दोन्ही आंदोलकांना घेऊन मैदानाबाहेर गेले.
याआधी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातही जारविस नावाची व्यक्ती वारंवार सुरक्षा तोडून मैदानात शिरत होती. आणि आता आंदोलकच इंग्लंडच्या मैदानांमध्ये येत आहेत, त्यामुळे इंग्लंडच्या मैदानांमधल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.