पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२३च्या आयोजनावरून गेल्या वर्षभरापासून वाद रंगला होता. अखेर आशिया क्रिकेट काउन्सिलने गुरुवारी स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. स्पर्धेचे आय़ोजन पाकिस्तानमध्ये होत असलं तरी केवळ ४ सामने तिथे होणार आहेत.
आशिया कपचे यजमानपद फक्त पाकिस्तानच नाही तर श्रीलंकेकडेसुद्धा सोपवण्यात आले आहे. पाकिस्तान यजमान असलेल्या या स्पर्धेतील सर्वाधिक सामने श्रीलंकेत होणार आहेत. एकूण १३ सामन्यांपैकी ९ सामने श्रीलंकेत होणार असून यात फायनलचा समावेश आहे.
आशिया क्रिकेट काउन्सिलने गुरुवारी आशिया कपबाबत महत्त्वाची घोषणा केली. त्यात सांगितलं की, ३१ ऑगस्ट पासून १७ सप्टेंबर दरम्यान स्पर्धा खेळवली जाईल. पाकिस्तानला ४ तर श्रीलंकेला ९ सामन्यांचे यजमानपद दिले आहे. भारताने गेल्या वर्षीच स्पष्ट केलं होतं की, पाकिस्तानमध्ये आशिया कपसाठी जाणार नाही.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी म्हटलं होतं की, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळणार नाही. या स्पर्धेचे सामने इतर देशात जाऊन भारत खेळू शकतो. जय शहा यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकीसुद्धा दिली होती.
बीसीसीआय पाकिस्तानमध्ये न खेळण्यावर ठाम राहिली आणि अखेर पीसीबीला हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव मान्य करावा लागला. यातही पाकिस्तान तोंडावर पडले कारण त्यांना जास्ती जास्त मॅचेस पाकिस्तानमध्ये खेळायच्या होत्या. पण त्यांच्या पदरी केवळ ४ सामन्यांचे आय़ोजन आले.
पाकिस्तानकडून मोठ्या सामन्यांचे यजमानपद काढून घेण्यात आलं आहे. बीसीसीआयला धमकावल्यानंतरही त्यांना यजमानपद कायम राखता आलं नाही. पाकिस्तानमध्ये तीन लीग सामने आणि एक नॉक आउट सामना होणार आहे. तर फायनल आणि सेमीफायनल श्रीलंकेत होणार आहे.