कोल्हापूर शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिर आहे. मध्यवस्तीत असलेले हे गणेश मंदिर गणेश भक्तांनी भरलेले असते.
या मंदीरात असणारी गणपतीची मूर्ती ही पंचमुख आणि दशभुज बैठी स्वरुपात विराजमान आहे. या अनोख्या रुपाचे असे हे एकमेव मंदिर कोल्हापुरात आहे.
गणेशाच्या उपासना विविध रुपात केल्या जातात. त्यातील दशभुजा गणपतीचे स्वरूप हे ब्रम्हांडाचा कर्ता / अधिष्ठाता म्हणजेच ज्या शून्य तत्वातून ब्रम्हांडाची निर्मिती झाली, त्या ब्रम्हांडाचे प्रतीक म्हणून ज्या गणेशाची पूजा केली जाते त्या गणेशाला दशभुजा गणेश म्हटले जाते, अशी माहिती मूर्ती अभ्यासक उमाकांत रानिंगा यांनी दिली आहे.
या मंदिराचा सभा मंडप प्रशस्त आहे. या सभामंडपात उंदीर आणि कासव आहे. तर आतमध्ये गाभाऱ्यात गणेशाची सुंदर मूर्ती आहे.
गाभारा आणि सभा मंडप यांच्यामध्ये काच लावण्यात आली आहे. मूळ मुर्तीच्याच खाली उत्सव मूर्ती ठेवण्यात आली आहे.
मूर्तीच्या दहा भुजांमधील उजव्या खालच्या हातात चक्र सदृश्य आयुध, बाण, स्वत:चा अर्धा दात, तलवार आणि परसु ही आयुधे आहेत. तर डाव्या वरच्या हातात त्रिशूल, ढाल, शंख, धनुष्य आणि सर्वात खालचा हात हा वरद मुद्रेत आहे.
गणेशमूर्तीला असणारी पाच मुखं ही पंचतत्व आणि पंचकोश यांचे प्रतीक आहेत, तर मूर्तीच्या दहा भुजा अर्थात हात हे गणरायाच्या दशदिशांवर असलेल्या आधिपत्याचे प्रतिनिधित्व करतात, अशा आशयाचा बोर्ड मंदिराच्या बाहेर लावण्यात आला आहे.
गणेश जयंती मंदिरात जन्मकाळ सोहळा साजरा केला जातो. या निमीत्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली आहे.