हिंदू धर्मात देवपूजेला विशेष महत्त्व आहे. देवपूजेचे काही नियमही आहेत. जसे की, मंदिरात आंघोळ करून जावं. मद्यपान, धूम्रपान न करता मंदिरात प्रवेश करावा. हे नियम आपण काटेकोरपणे पाळतो. परंतु तुम्ही कधी कोणाला थेट मंदिरातच दारूची बाटली घेऊन जाताना पाहिलंय का? असं करण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. मात्र...
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील दूनी भागात वसलेल्या दुणजा देवीच्या मंदिरात भक्त चक्क दारूची बाटली घेऊन गाभाऱ्यात जातात. आश्चर्य वाटलं ना? परंतु हे तिथे चुकीचं मानलं जात नाही, तर तशी प्रथाच आहे.
मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे पुत्र भोमा राम यांनी स्वतः सांगितलं की, मंदिरात देवीला दारूचं नैवेद्य दाखवलं जातं. भक्त स्वतः देवीसाठी दारू घेऊन येतात. विशेष म्हणजे देवीला नैवेद्य दाखवताना तिच्या चहूबाजूंनी पडदा लावला जातो. पूर्वी ही प्रथा नव्हती, परंतु मंदिराचं नूतनीकरण झाल्यापासून पडद्याच्या आत दारूचं नैवेद्य दाखवलं जातं.
दूनी नगराला पूर्वी 'द्रोणनगरी' या नावाने ओळखलं जायचं. या नगरात तलावाकिनारी दुणजा देवीचं प्राचीन मंदिर वसलेलं आहे. वर्षाचे बारा महिने येथे देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. तर, नवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दुणजा देवीच्या या मंदिराला तब्बल 900 वर्षांचा इतिहास आहे. याठिकाणी देवी नैसर्गिकरीत्या स्थापित झाल्याची आख्यायिका आहे. येथील सरपंच असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भंवरलाल जाट यांनी सांगितलं की, सरकारने ट्रस्ट स्थापन केल्यापासून मंदिरासाठी भाविक मोठ्याप्रमाणात दान करू लागले आहेत. त्यातून हळूहळू धर्मशाळा आणि दूरदूरहून येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.