गेल्या काही काळापासून पुणेकर मान्सूनच्या प्रतिक्षेत होते. आज (24 जून) पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ही प्रतिक्षा संपली आहे. आज सकाळपासूनच पुणे शहर परिसरातील वातावरण ढगाळ झाले होते.
पुण्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. मध्यवर्ती भागासह उपनगरांत पावसाच्या सरी आल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची सुरुवात झाली होती.
एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे उष्णतेने पुणेकर हैराण होते. पुणे शहराचे तापमान 40 ते 42 अंशपार गेले होते. पण आज शहरात ढगाळ वातावरणानंतर पाऊस झाल्याने पुणेकर सुखावले आहेत.
शहरातील कात्रज, कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडी, धायरी फाटा, वारजे, शिवणे, हिंगणे, सिंहगड रोड, नांदेड सिटी, स्वारगेट, सेनापती बापट रोड विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
मान्सून 23 जूननंतर पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले होते. आता पाऊस सुरू झाल्याने नागरिकांनी रेनकोट, छत्री बाहेर काढावी लागणार आहे.
25 आणि 26 जून रोजी कोकण लगत भाग आणि पुणे शहरा लगतच्या घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यावेळी शहरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुढील 3-4 तासांत रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.