पुणेकरांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून दरवर्षी भीमथडी जत्रा भरवली जाते. यंदाच्या जत्रेत वेगवेगळ्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडतंय. 'सांग सांग भोलानाथ' या गाण्यातील भोलानाथ म्हणजेच नंदी हा भीमथडी यात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण यात्रेमध्ये नंदीबैल सर्वत्र फिरतोय. त्यासोबतच लहान मोठे सर्वजण फोटो देखील काढून घेत आहेत.
भीमथडीच्या जत्रेत खानदेश स्पेशल मांडे म्हणजे मोठी पुरणपोळीची टेस्ट करण्याची संधी पुणेकरांना आहे. मस्तपैकी खरपूस चुलीवरती बनवलेली ही पुरणपोळी खाण्यासाठी मोठी गर्दी होतीय.
ग्रामीण भागाचा महत्त्वाचा पैलू म्हणून कुंभार कामाकडे पाहिले जाते. या जत्रेत कुंभार विविध मातीच्या वस्तू बनवताना दिसतात. त्यांच्यासोबत पणत्या बनवण्याचा अनुभवही तुम्हाला घेता येईल.
आतापर्यंत तुम्ही मोठ्या आकाराच्या जाती बघितली असतील. भीमथडी यात्रेमध्ये लहान जाती देखील मिळतात. ही अनेकांच्या आकर्षणाचा विषय असून अकराशे रुपये पासून खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
घरोघरी असलेल्या मिक्सरमुळे पारंपारिक वाटणाचे साहित्य लुप्त होत आहे. भीमथडीच्या जत्रेमध्ये पारंपारिक दगडी खलबत्ते देखील विक्रीस उपलब्ध आहेत.
जत्रा म्हटलं की भविष्य सांगणारे आलेच. भीमथडी जत्रेतही ज्योतिषी आहेत. ही महिला त्यांच्याकडून अगदी लक्षपूर्वक भविष्य ऐकत आहे.
भीमथडीच्या जत्रेत फक्त राज्यातल्याच नाही तर देशभरातील कलाकारांची कला पाहण्याची संधी आहे. राजस्थानच्या पारंपारिक पुचाई या कापडावरील चित्रकलेचे विविध नमुने या जत्रेत लक्षवेधी ठरत आहेत.
उत्तर प्रदेशची पारंपारिक 'बीड वर्क ज्वेलरी' देखील इथं खरेदी करण्याची संधी आहे.या ज्वेलरीची किंमत 80 ते 1000 रुपये या रेंजमध्ये आहे.