पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारत खनिज तेलाबाबतीत स्वयंपूर्ण नाही. भारतात 89 टक्के तेल आयात केलं जातं. सोबतच एकूण गरजेपैकी 53 टक्के नैसर्गिक वायूही देशाला आयात करावा लागतो. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतावर होतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमती आणि केंद्र तसंच राज्य सरकारकडून लादले जाणारे कर या दोन प्रमुख घटकांमुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. राज्य सरकारांनी मूल्यवर्धित करांमध्ये वाढ केली आहे. तर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्यांचा महसूल घटला. महसुली तूट भरून काढण्यासाठी केंद्रानं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १९.९८ रुपये प्रति लिटरवरून ३२.९८ रुपयांवर नेले. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १५.८३ रुपयांवरून ३१.८३ रुपयांपर्यंत वाढवलं.
वास्तवात पाहायला गेल्यास असं लक्षात येतं, की पेट्रोल, डिझेलचा दर कमी आहे. मात्र त्यापेक्षा त्यावरील करांचं प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, डीलरचं कमिशन, केंद्राकडून आकारण्यात येणारं उत्पादन शुल्क आणि व्हॅट यांच्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होते. दिल्लीत पेट्रोलच्या दरातील करांचा वाटा ६० टक्के आहे. तर डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण ५५ टक्के आहे.
एप्रिल २०२० मध्ये कोरोना संकटामुळे तेलाच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली. तेलाचे दर १९ बॅरलपर्यंत कोसळले. मात्र आता जगातील अनेक देशांमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. तेलाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या दरांत वाढ झाली आहे.
भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण केलं जात असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये पेट्रोलचे दर नेमके किती आहेत हे पाहूया.
ग्लोबल पेट्रोल प्राईजेस डॉट कॉमच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीला श्रीलंकेत पेट्रोलचा दर ६०.२९ रुपये इतका होता. नेपाळमध्ये पेट्रोलची किंमत ६९.०१ रुपये, पाकिस्तानात ५१.१२ रुपये, बांग्लादेशात ७६.४३ रुपये होती. शेजारी देशांमध्ये डिझेलदेखील स्वस्त आहे. श्रीलंकेत ३८.९१ रुपये, नेपाळमध्ये ५८.३२, पाकिस्तानात ५३.०२, बांग्लादेशात ५५.७८ रुपयांनी डिझेल विकलं जातं.