सध्या कोरोना काळात मास्क खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत असे बरेच मास्क तुम्ही पाहिलेत. आपल्या लग्नासाठी अनेकांनी चांदी आणि सोन्याचे मास्क बनवून घेतल्याचंही तुम्ही पाहिलं. असाच हा सोन्याचा मास्क आहे. मात्र हा गोल्डन मास्क थोडा वेगळा आहे.
हा मास्क फक्त मास्कच नाही तर नेकलेसही आहे. कोरोना काळात तुम्ही याचा मास्क म्हणून वापर करू शकता आणि जेव्हा आपल्याला मास्कची गरज पडणार नाही तेव्हा हा मास्क तुम्ही नेकलेस म्हणून वापरू शकता.
पुण्यातील रांका ज्वेलर्सने हा नेकलेस कम मास्क तयार केला आहे. सोन्याचा शर्ट, सोन्याची पैठणी आणि शाल, पुण्यातल्या मानाच्या गणपती बाप्पासाठीही चांदीचे सिंहासन अशा गोष्टी याआधी राकां ज्वेलर्सने साकारल्या आहेत.
22 कॅरेट सोन्यामध्ये घडवण्यात आलेल्या नेकलेस कम गोल्डन मास्कचे वजन अवघं 124.5 ग्रॅम आहे. हा सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. हा मास्क बनविण्यासाठी कारागिरांना 2 आठवडे लागले.
एन 95 मास्कवर स्टिच केलेला हा नेकलेस चोकर आहे. या मास्कमधून श्वास घेता यावा यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे डिझाईन हे टर्किश स्टाईलमध्ये पाहावयास मिळते.
हा मास्क स्वच्छ करण्यासाठी खास असा ‘युव्ही सॅनिटायझर बॉक्स’ ग्राहकांना भेट म्हणून दिला जाईल. शिवाय नेकलेस ज्या मास्कवर घडवण्यात आला आहे, तो मास्कही बदलता येऊ शकतो.