इर्शाळवाडी येथे 50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. हे ठिकाण इर्शाळगडाच्या पायथ्याशी आहे. इर्शाळवाडी इर्शाळगडामुळेच प्रसिद्ध आहे. यथे प्रत्येक पावसाळ्यात लोक पर्यटनासाठी येत असतात.
इर्शाळगड हा रायगड जिल्ह्यात येतो. मुंबई पुणे जुना महामार्गावर चौक जवळ मोरबे धरण येथे जाण्यासाठी मार्ग आहे. याच मार्गाने पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतात.
इर्शाळगडाची उंची 3700 फूट असून पायथा ते किल्ला जाण्यासाठी दोन तासाचा वेळ लागतो. अनेक लोक येथे ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात.
किल्ल्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे वर असलेलं नैसर्गिक छिद्र, ज्याला मराठी नेढे किंवा इंग्रजीत ‘नीडल्स आय’ असंही म्हणतात. सामान्य उंचीच्या माणसाला आरपार जात येईल असे हे नेढे आहे.
गडाचे सर्वोच्च ठिकाण म्हणजे इर्शाळगड सुळका. मात्र इथपर्यंत जाण्यासाठी कुशल गिर्यारोहण कौशल्य लागते. गडाच्या उत्तरेस कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड आहे तर ईशान्येस माथेरान आहे. गडावरून पश्चिमेकडे मोरबे धरणाचे छान दृश्य दिसते.
इर्शाळगड हा किल्ला नसून खरे तर शिखर आहे. असेही काही लोक म्हणतात. माणिकगड आणि प्रबळगड दरम्यानच्या परिसराची देखरेख करण्यासाठी टेहळणी बुरूज म्हणून त्याचा वापर केला जात असावा, असा लोकांचा अंदाज आहे.