संसार टिकवणं, फुलवणं ही अतिशय कठीण गोष्ट असते. एकमेकांशी चांगला संवाद साधून, विश्वास दाखवून संसार सुखाचा करता येतोच, पण काही गोष्टी उघडपणे न बोलणं हेही गरजेचं असतं.
नात्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी आधीच्या बॉयफ्रेंडबद्दलच्या तुमच्या भावना नवऱ्याला सांगितल्या, तर याचा परिणाम उलट होऊ शकतो. नवऱ्याशी प्रामाणिक राहण्याच्या नादात तुम्ही त्याची नाराजी ओढवून घ्याल.
बायकोने त्याचे आई-वडिल किंवा भावंडांच्या तक्रारी केलेलं कोणत्याच नवऱ्याला आवडत नाही. त्यामुळे सासरच्या माणसांविषयी काही समस्या असेल, तर ती सोडवण्यासाठी योग्य शब्दांत तुमचं म्हणणं मांडा. तक्रारीचा सूर लावला, तर वाद होऊ शकतात.
नवऱ्याविषयी तुमच्या कुटुंबाच्या भावना तुमच्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. कदाचित त्यांना तो फारसा आवडत नसेल; पण ही गोष्ट नवऱ्याला सांगून त्याला दुखावणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी नवऱ्यासमोर उघड करू नका.
ऑफिस किंवा इतर ठिकाणी इच्छा नसूनही काही वेळेला एखाद्याबद्दल आकर्षण निर्माण होतं. पण अशा गोष्टी नवऱ्याला सांगण्याचा वेडेपणा करू नका. यामुळे तुमच्या नात्याला तडे जाऊ शकतात.
नात्यामध्ये खूप जास्त प्रेम असेल, तर काही वेळेला असुरक्षिततेची भावनाही वाढू शकते. नात्यात तुमचं महत्त्व किती आहे हे दाखवून देण्यासाठी नवऱ्याची परीक्षा घेण्याची दरवेळी गरज नसते. यामुळे नवऱ्याला तुमच्याबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होऊ शकते. अतीप्रेमापोटी केलेलं कृत्य तुमच्या अंगलट येऊ शकतं.
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. नवरा-बायकोच्या नात्यात एकमेकांचे गुण-दोष एकमेकांना सांगावे हे बोलायला सोपं असलं, तरी ते दरवेळी समोरच्याला रुचत नाहीत. त्यामुळे नवऱ्याची एखादी न पटलेली गोष्ट त्याला हसत-खेळत सांगण्याचा प्रयत्न करा.
बायकांना घरखर्चाच्या पैशांतून थोड्या पैशांची बचत करायची सवय असते. बरेचदा नवऱ्याच्या अपरोक्ष स्त्रिया पैसे साठवतात. गरज पडल्यास हे पैसे त्या घरासाठी, कुटुंबासाठीच खर्च करतात. मात्र बऱ्याच नवरे मंडळींना ही गोष्ट पटत नाही.
बायका त्यांचं मन बहिणीपाशी किंवा एखाद्या मैत्रिणीपाशी मोकळं करतात, पण ही गोष्ट नवऱ्याला चुकूनही सांगणं योग्य ठरणार नाही. कारण यामुळे नवऱ्याला वाईट वाटू शकतं.
विचारांमध्ये मतभेद असले, तरी पटकन तोंडावर नकार देणं वाद वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. नवरा-बायकोमध्ये असे प्रसंग अनेकदा येतात. त्यावेळी परिस्थिती पाहून होकार किंवा नकार देणं हिताचं ठरतं.