हा एक बोधीवृक्ष आहे. श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी भारत भेटीवर असताना हा वृक्ष लावला होता. बौद्ध धर्मात या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या झाडाला विशेष संरक्षण पुरवलं जातं. भगवान गौतम बुद्धांना याच बोधीवृक्षाखाली साक्षात्कार झाल्याचं मानलं जातं.
या झाडाभोवती 15 फूट उंज जाळीचं संरक्षण उभारण्यात आलं आहे. दोन सुरक्षारक्षक सतत इथं पहारा देत असतात. कुणीही या झाडाला इजा पोहोचवू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. या झाडाचं एक पान जरी गळालं तरी प्रशासनातील अधिकारी तिथं पोहोचून झाडाची पाहणी करतात. दर 15 दिवसांनी या झाडाची पाहणी केली जाते आणि त्याच्या खत-पाण्याची सोय केली जाते.
रायसेन जिल्ह्यात सांची हे एक पर्यटनस्थळ आहे. अनेक वर्षांपूर्वी इथं बौद्ध युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली होती. याच विद्यापीठाच्या डोंगरावर हा वृक्ष लावण्यात आला आहे. त्यावेळी श्रीलंकेच्या तत्कालीन अध्यक्षांसोबत तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानदेखील उपस्थित होते. या झाडाच्या सुरक्षेवर सरकारकडून आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सांचीला जाऊन कुणीही हे झाड पाहू शकतो. भोपाळमार्गे इंदूरवरून सांचीला जाता येतं. भोपाळवरून सांची जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे.