आपण स्वतःला पुढारलेले म्हणवतो, मात्र आजही आपल्या समाजात असे अनेक विषय आहे, ज्यांच्याबाबत आपण रूढी-परंपरेच्या जाळ्यातून अद्यापही बाहेर पडलेलो नाही. किन्नर समुदायाबाबतदेखील आपलं मत पूर्णपणे बदलेलं नाही. आपल्या अधिकारांसाठी ते न्यायालयासह समाजाशी लढत आहेत. यापैकीच एक म्हणजे चंदीगडमधील धनंजय चौहान.
किन्नरांना त्यांचे न्यायहक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर पूर्ण ताकदीनिशी लढायचं त्यांनी ठरवलं आहे. पंजाब विद्यापीठात किन्नरांना वेगळं बाथरूम देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर केवळ बाथरूमच नाही, तर आता या विद्यापीठातील किन्नर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि वेगळ्या हॉस्टेलची सुविधाही मिळाली आहे.
धनंजय चौहान आता किन्नरांना रोजगार मिळवून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांना भीक मागावी लागू नये, शरीरविक्री करावी लागू नये. याचाच एक भाग म्हणून त्यांनी किन्नरांसाठी फूड व्हॅन अभियानसुद्धा सुरू केलं होतं. मात्र चंदीगड प्रशासनाकडून त्याला परवानगी मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
धनंजय म्हणतात, एक असा समाज ज्याला कायमच वगळण्यात आलं, ज्याला उपेक्षा सहन करावी लागली. त्याला पुढे आणण्यासाठी काही बदल घडत असतील, तर प्रशासनाने पाठिंबा द्यायला हवा. वेदांमध्ये किन्नर गंधर्व यांचा उल्लेख आहे. मात्र आज आपला समाज किन्नरांकडे आदराने पाहत नाही. अधिकार मिळणं तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे ही लढाई सुरूच राहणार.
धनंजय चौहान असंही सांगतात की, बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने एक गाडी भेट म्हणून दिली होती, ज्यामधून व्हॅन रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी सुरू होती. मात्र प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्याने गाडीही तशीच पडून आहे.