राजस्थानमध्ये जन्मलेल्या रवींद्र कौशिक यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ होता. कौशिक यांना लहानपणापासूनच थिएटरची आवड होती. थिएटर सुरू असतानाच एकदा रॉ ची नजर त्यांच्यावर पडली, तेव्हापासूनच भारताच्या सगळ्यात मोठा गुप्तहेर बनण्याची कहाणी सुरू झाली.
थिएटरमधलं त्यांची ऍक्टिंग बघून रॉचे सदस्य प्रभावित झाले. एका मोनो-अॅक्टमध्ये ते भारतीय लष्करातल्या अधिकाऱ्याचा रोल करत होते. चीनच्या लष्कराने पकडल्यानंतर भारताबद्दलची माहिती द्यायला त्यांनी नकार दिला, अशी त्या मोनो-अॅक्टची कहाणी होती. रॉ चे अधिकारी रवींद्र कौशिक यांच्या अभिनयाच्या प्रेमात पडले.
रॉ मध्ये निवड झाल्यानंतर त्यांना 2 वर्ष ट्रेनिंग देण्यात आलं. 1975 साली त्यांना पहिल्यांदा मिशनवर पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं. अंडरकव्हर राहून पाकिस्तानमधली माहिती भारतामध्ये पाठवणं हे त्यांचं काम होतं. रॉ ने त्यांना पाकिस्तानमध्ये नबी अहमद शाकिर या नावाने पाठवलं होतं, पण कहाणी इथेच संपत नाही.
नबी अहमद शाकिर नाव घेऊन रवींद्र कौशिक पाकिस्तानमध्ये पोहोचले, सगळ्यात आधी त्यांनी कराचीच्या लॉ युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली. तिथून ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्करामध्ये कमीशन ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली. यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या मेजर पोस्टवर पदोन्नतीही मिळाली. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचं काम पाहून खूश झाल्या आणि त्यांनी रवींद्र कौशिक यांना ब्लॅक टायगर नाव ठेवलं.
रवींद्र कौशिक यांनी पाकिस्तानमध्ये एका स्थानिक मुलीशी लग्नही केलं. तसंच ते एका मुलीचे वडीलही झाले. 1979 ते 1983 पर्यंत त्यांनी पाकिस्तानमधून महत्त्वाची माहिती घेतली, यामुळे रॉ ला भारतीय सुरक्षेची रणनीती मजबूत करण्यात मदत झाली. इथपर्यंत त्यांचं काम व्यवस्थित चाललं होतं, पण 1983 साली सगळं काही बदललं.
1983 साली भारतीय गुप्तहेर इनायत मसीहा बॉर्डर क्रॉस करताना पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आली, तेव्हा तपासामध्ये तिने रवींद्र कौशिक यांचं नाव घेतलं. गुप्तहेरी केल्याच्या आरोपाखाली कौशिक यांना अटक करण्यात आली आणि त्यांना मुल्तानच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं.
रवींद्र कौशिक यांना फाशीची शिक्षा झाली, पण पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली. 2001 साली हृदयविकाराचा धक्का आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. भारतासारख्या मोठ्या देशासाठी बलिदान देणाऱ्याला हेच मिळतं का? असा प्रश्न रवींद्र कौशिक यांनी त्यांच्या भावाला लिहिलेल्या पत्रात विचारला होता. रवींद्र कौशिक यांच्या भावानेच त्यांच्या या पत्राबद्दलची माहिती दिली. रवींद्र कौशिक यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने हालचाली केल्या नव्हत्या.