सहरसा, असं म्हणतात की देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलात तरी तुम्हाला इथले रिक्षा चालक ते प्रशासकीय अधिकारी सापडतील. प्रत्येक वर्षी युपीएससी परीक्षा पास करणाऱ्यांमध्ये बिहारचे सर्वाधिक विद्यार्थी असतात. बिहारच्या सहरसा जिल्ह्यात एक गाव असं आहे, ज्याला आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. या गावाचं नाव आहे बनगाव.
या गावामध्ये अनेक कुटुंब अशी आहेत, ज्यांच्या घरातून स्वातंत्र्यानंतर एक-दोन नाही तर तीन-चार जण प्रशासकीय सेवेमध्ये आले आहेत. याच कारणामुळे फक्त सहरसाच नाही तर पूर्ण बिहारमध्ये या गावाची चर्चा होते. वर्ल्ड बँकेमध्ये वॉटर ग्लोबल प्रॅक्टिसचे डायरेक्टर सरोज कुमारही बनगावचे आहेत.
संत लक्ष्मीनाथ गोसाई यांची कर्मभूमी असलेल्या बनगावमधून आतापर्यंत पाच डझनपेक्षा जास्त जणांनी युपीएससी परीक्षा पास केल्याचं सांगितलं जातं. एवढच नाही तर गावात डॉक्टर, इंजिनिअर आणि बीडीओ-सीओ देखील मोठ्या प्रमाणावर आहेत.
याच कारणामुळे बनगावसोबत चैनपूर, पर्री, महिषी, मोहनपूर, मुराजपूर या गावांमधून युपीएससी परीक्षा पास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
युपीएससीचा निकाल लागतो तेव्हा बनगावातून किती जणं पास झाले? असंही आजूबाजूच्या गावातली लोकं विचारतात.
गावातले स्थानिक रहिवासी असलेले मणिकांत झा सांगतात की या गावाला ज्ञानाचा वारसा आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीवर सरस्वतीचा आशिर्वाद आहे आणि लक्ष्मीनाथ गोसाईंचा हात आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्ड, गल्ली-मोहल्ल्यातून आयएएस-आयपीएस अधिकारी तुम्हाला बघायला मिळतील.
मोठे ऑफिसर, इंजिनिअर यांच्यासोबत गावात पोलीस अधिकारीही आहेत, असंही मणिकांत झा म्हणाले. हे सांगतांना त्यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावंही सांगितली.