5 ऑगस्ट २०१३ रोजी दिल्लीतील अशोक विहारमध्ये २३ वर्षांची एअर होस्टेस गीतिका शर्मा तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली होती. आत्महत्येआधी तिने एक सुसाइड नोट लिहिली होती. त्यात तिने हरियाणाच्या तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये गृहराज्य मंत्री असणाऱ्या गोपाल कांडा यांच्यावर छळाचा आरोप केला होता. गोपाल कांडा यांच्यासोबत इतर एका व्यक्तीला आरोपी करण्यात आलं होतं. कांडा तेव्हा एक प्रभावी राजकीय नेते आणि बिझनेसमन होते. गीतिका शर्माच्या आरोपावनंतर कांडा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गीतिकाने तिच्या सुसाइड नोटमध्ये गोपाल कांडा आणि अरुण चड्डा यांना जबाबदार ठरवलं होतं. गीतिकाने म्हटलं होतं की, आज मी स्वत:ला संपवत आहे. मी पूर्ण कोलमडून गेलीय. माझा विश्वास गमावलाय, मला फसवण्यात आलंय. माझ्या मृत्यूसाठी गोपाल कांडा आणि अरुण चड्डा जबाबदार आहेत. दोघांनी माझा विश्वास तोडला. स्वत:च्या फायद्यासाठी माझा वापर केला. या लोकांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दोघांना शिक्षा मिळायला हवी.
गीतिका शर्मा ही गोपाल कांडा यांच्या एमएलडीआर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. कंपनीने तिला संचालक म्हणून प्रमोशन दिलं होतं. गीतिकाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईनेसुद्धा आत्महत्या केली होती. त्यानतंर गोपाल कांडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
गोपाल कांडावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होताच. त्याशिवाय बलात्कार आणि अनैसर्गिक संबंधांचे आरोपही करण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्कार आणि अनैसर्गिक संबंधांचे आरोप रद्द केले होते. २०१२ मध्ये पोलिसांनी कांडाला चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा गोपाल कांडाने सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानतंर अरुण चड्ढाला अटक केली होती तर गोपाल कांडाला पोलिसांनी फरार घोषित केलं होतं.
8 ऑगस्ट २०१२ रोजी गोपाल कांडाने जामीनासाठी याचिका दाखल केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी लूकआऊट नोटिस जारी केली. १७ ऑगस्ट २०१२ रोजी गोपाल कांडाची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाल कांडा पोलिसांसमोर हजर झाला होता.