सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण, 11 दिवसांची एक नवजात चिमुकली आपल्या जन्माच्या पाचव्या दिवसापासून कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. नवजात बाळ आईच्या संपर्कात आल्याने कोरोना संक्रमित झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.
अमरोली भागातील एका 30 वर्षीय महिलेला 1 एप्रिल रोजी डिलिव्हरीसाठी डायमंड रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी महिलेने चिमुकलीला जन्म दिला.
रुग्णालयातील बाल रोग विशेषज्ञ डॉक्टर अल्पेश सिंधवी यांनी सांगितलं की, बाळाच्या जन्मावेळी त्याला श्वास घेण्यास समस्या येत होती. परंतु ही सामान्य बाब असून अनेक बाळांमध्ये असा प्रकार दिसतो.
बाळाला 5 एप्रिलपर्यंत आईचं दूध देण्याऐवजी फार्मूला फीड देण्यात आलं. 5 एप्रिल रोजी बाळाची स्थिती सुधारल्याने आईला दूध पाजण्यासाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर 6 एप्रिल रोजी चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बाळाचा एक्स-रे करण्यात आला.
6 एप्रिल रोजी फुफ्फसं क्लियर होती, परंतु पुढच्या दिवशी एक्स-रेमध्ये एक मोठी सफेद जागा दिसली, जेथे संक्रमण परसलं होतं. त्यानंतर अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून चिमुकलीला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून Remdesivir इंजेक्शन देण्यात आलं आहे. तसंच प्लाज्मा ट्रिटमेंटसाठीही योजना असल्याची माहिती डॉक्टर सिंधवी यांनी दिली.