मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या कारला शनिवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सोमाटणे फाट्याजवळ अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की सुसाट आलेली कार रस्त्यालगतच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दुजाकाचा भलामोठा पत्रा काचेतून मागील बाजुला बसलेल्या आजी-आजोबांपर्यंत पोचला. यामुळे कार 'लॉक' झाली. कारचा ड्रायव्हर बाहेर फेकला गेला. अपघातात कारमधील आजी-आजोबा आरडाओरड करू लागले; पण काही केल्या मदत मिळाली नाही.
मुंबईहून पुण्याकडे निघालेले डॉ. गेठे यांनी अपघात पहिला आणि आपली गाडी थांबवून थेट आजी-आजोबांना बाहेर काढण्यासाठी स्वतः धडपड केली. तरीही, त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.
शेवटी आपत्कालीन यंत्रणा बोलावून कारचे दरवाजे कापले आणि आजी-आजोबांना सुरक्षितपणे बाहेर काढले. भीषण अपघाताने प्रचंड घाबरलेल्या आजी-आजोबांना डॉ. गेठेंनीच जागेवर उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून तिघांना पवना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
या तिघांवर तातडीने आणि योग्य उपचार होतील यासाठी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्यानंतरच डॉ. गेठे निघून आले.
डॉ. राहुल गेठे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) आहेत. डॉ. राहुल गेठे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. शिवाय ते डॉक्टर आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील डॉ. गेठे हे विश्वासू सहकारी आहेत. अपघातात अडकलेल्या आजी-आजोबांवर उपचार करण्यापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेमके काय उपचार करायचे? हे त्यांनी लगेचच सांगितले.