आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या विक्रीवर दबाव पाहायला मिळाला. एमसीएक्सवर डिसेंबरच्या डिलिव्हरीचे सोने 50,653 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. चांदीची वायदा किंमत कमी होऊन 61,512 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. तज्ज्ञांच्या मते 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रापासून देशात फेस्टिव्ह सीझन सुरू होत आहे, यावेळी सोन्याची मागणी वाढू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरमध्ये तेजी कायम असल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर कमी होऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात उतरल्या किंमती- विदेशी बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्के ने कमी होऊन 1,906.39 डॉलर प्रति औंस झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 2 टक्क्याहून अधिक प्रमाणात घसरण झाली आहे. चांदीचे दर 0.2 टक्केने कमी होत 24.26 डॉलर प्रति औंस झाले आहेत, तर प्लॅटिनमचे दर 0.2 टक्क्याने वाढून 866.05 डॉलर झाले आहेत.
7 ऑगस्ट 2020 रोजी सो्याचे दर सराफा बाजारात 56,254 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. चांदीचे दर देखील यादिवशी 76,008 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. सोन्याच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घेता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अनेक देश त्यांची अर्थव्यवस्था मजबुत करण्याच्या प्रयत्नात आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षापर्यंत डॉलरमधील मजबुतीबरोबरच सोन्याच्या किंमतीत अचानक तेजी येऊ शकते.
अमेरिकन डॉलरला आलेली मजबुती आणि अमेरिकेतील आर्थिक पॅकेज संदर्भातील अनिश्चितता यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी माहिती दिली की आर्थिक पॅकेजबाबत ते इच्छूक आहेत, पण सीनेटचे प्रमुख नेते मिच मॅककोनल यांनी ते नाकारले आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीआधी हे पॅकेज मंजूर केले जाईल की नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे, त्यामुळे सोन्याच्या व्यवहार एका मर्यादेमध्येच होत आहे.