मोहिनी वैष्णव, पुणे, 29 एप्रिल: आपला स्वतःचा व्यवसाय असावा असं प्रत्येकाला वाटतं. नोकरी करताना ही नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु करावा असा विचार अनेकांच्या डोक्यात येतो. अनेकदा खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील गर्दी पाहून असा स्टॉल सुरु करुन कमाई करावी असंही आपल्याला वाटतं. मात्र प्रत्येकाला असं करणं जमत नाही. कारण व्यवसाय म्हटलं की, त्यात जोखिम असते. मात्र पुण्यातील एका इंजीनियर तरुणाने हे करुन दाखवलंय. नितीन राठोड या सॉफ्टवेअर इंजीनियर तरुणाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतःचं मिसळ हाऊस उभारलंय. नितीन राठोड हे मुळचे अकोल्याचे आहेत.
सात्विक मिसळ या मिसळ हाऊसचे ओनर नितीन राठोड हे एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत. मात्र त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी ही नोकरी सोडून स्वतःचं काही तरी सुरु करण्याचा विचार केला. विशेष म्हणजे त्यांना बालपणापासूनच कुकिंगची आवड होती. कारण त्यांचे आजोबा हे कुक होते. मग काय नेमकं काय सुरु करावं याचं प्लानिंग सुरु झालं.
नॉनव्हेज रेस्टॉरंट सुरु करायचा प्लान होता. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने हा प्लान रद्द करावा लागला. अशा वेळी ऑल टाइम फेव्हरेट मिसळचा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी आपलं पहिलं हॉटेल पुण्यातील सांगवीमध्ये सुरु केलं आणि इथूनच सुरु झाला हा त्यांचा सुंदर प्रवास.
नोकरी करुन केलेली सर्व सेव्हिंग आणि कर्ज घेऊन नितीन राठोड या तरुणाने 2019 मध्ये आपला व्यवसाय सुरु केला आणि अवघ्या पाच वर्षांमध्ये त्यांनी आपला व्यवसाय राज्याबाहेर नेलाय. आज पुण्यातील कोथ्रुड, वाकड, सांगवी, आकुर्डी सोबतच कर्नाटकातील विजापुरातही त्यांचं आउटलेट आहे. आज त्यांचा महिन्याला लाखोंची कमाई होत आहे. एवढंच नाही तर आज हा तरुण तब्बल 45 ते 50 जणांना रोजगार देत आहे.
फक्त 99 रुपयांत मिळते अनलिमिडेट मिसळ : सात्विक मिसळची खासियत म्हणजे, येथे फक्त 99 रुपयांमध्ये अनलिमिटेड मिसळ खायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे या मिसळला एक वेगळी चव आहे. या मिसळला दम मिसळं असंही म्हटलं जातं.
या मिसळची आणखी एक विशेषता म्हणजे घरगुती मसाल्यांनी ही मिसळ बनवली जाते. यांच्या मिसळला एक फारच सुंदर स्मोकी चव आहे. नावाप्रमाणेच अगदी सात्विक अशी ही मिसळ आहे. यामुळेच मिसळ खायला ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात.