रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये तत्कालीन 18 सरकारी बँकांद्वारे एकूण 1,48,428 कोटींच्या फसवणुकीची 12,461 प्रकरणे सूचित करण्यात आली आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आरबीआयकडून ही माहिती मिळाली आहे. आरटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार या फसवणुकीची शिकार देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-State Bank of India)झाली आहे. एसबीआयने 44,612.93 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या 6,964 प्रकरणांबाबत सूचित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात या 18 सरकारी बँकाची जेवढी फसवणूक झाली आहे त्याच्या 30 टक्के रक्कम एसबीआयची आहे.
अशी काही प्रकरणे समोर आले आहेत की, एटीएमच्या माध्यमातून क्लोनिंगचा वापर करत ग्राहकांची माहिती चोरी केली जाते. डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना फसवले जाते. एटीएममधून पैसे काढण्याची ही सुविधा सुरक्षित व्हावी याकरता एसबीआय ग्राहकांना ओटीपी आधारित पैसे काढण्याचा (SBI OTP-based ATM cash withdrawal) पर्याय देत आहे.