भारतासह जगात रेल्वे हे सर्वात स्वस्त आणि उत्तम वाहतुकीचे साधन मानली जाते. दररोज कोट्यवधीच प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्याचबरोबर लाखो टन मालाची वाहतूक होते. तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात लांब ट्रेन कोणती आहे? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
'द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयरन ओर' ही जगातील सर्वात लांब ट्रेन असल्याचे म्हटले जाते. 21 जून 2001 रोजी धावलेल्या या ट्रेनने सर्वात वजनदार ट्रेनचा तसेच सर्वात लांब ट्रेनचा जागतिक विक्रम मोडला, कारण तिची एकूण लांबी 7.3 किमी होती.
खरतर ही एक मालगाडी होती आणि तिला 682 डबे जोडलेले होते. 99,734 टन वजनाची ही ट्रेन खेचण्यासाठी 8 लोकोमोटिव्ह इंजिन बसवण्यात आले होते. ही ट्रेन यांडी आणि पोर्ट हेडलँड दरम्यान 275 किलोमीटर धावली आणि 82,000 टन लोह खनिज वाहून नेले.
जगातील ही सर्वात लांब ट्रेन एक ड्रायव्हर चालवत होता आणि 275 किमी अंतर कापण्यासाठी तिला 10 तास आणि 4 मिनिटे लागली. या ट्रेनचा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.
या ट्रेनने 1991 मध्ये दक्षिण आफ्रिकेत बनवलेल्या जगातील सर्वात लांब ट्रेनचा विक्रम मोडला. त्या मालगाडीत 660 डबे होते आणि तिची लांबी 7.19 किलोमीटर होती.
शेषनाग आणि सुपर वासुकी या भारतातील सर्वात लांब गाड्यांपैकी एक आहेत. सुपर वासुकी ही 295 कोच असलेली, 3.5 किमी लांबीची देशातील सर्वात लांब ट्रेन आहे, तर शेषनाग ट्रेनची लांबी 2.8 किमी आहे आणि ती चालवण्यासाठी 4 इंजिने वापरतात.