नवी दिल्ली, 13 जून: फिरायला जायला सर्वांनाच आवडतं. अशावेळी टूर पॅकेज स्वस्तात उपलब्ध झालं तर मजा काही औरच असते. तुम्हालाही या कमी पैशात परदेशात जायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला एक मस्त टूर प्लान सांगत आहोत. IRCTC ने बाली साठी एक अप्रतिम टूर पॅकेज आणले आहे. बाली हे इंडोनेशियातील एक शहर आहे. IRCTC च्या या प्लॅनमध्ये तुम्ही अगदी कमी पैशात बालीच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
आयआरसीटीसीचा हा बाली टूर खास लखनऊच्या लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलीय. लखनऊ विमानतळावरून बाली विमानतळापर्यंत प्रवासी उड्डाण करतील. टूरच्या दुस-या दिवशी बाली येथे पोहोचल्यावर पर्यटकांना केकक नृत्य परफॉर्मेंससह उलवाता मंदिरातील सनसेटचा आनंद लुटता येणार आहे.
टूरच्या तिसऱ्या दिवशी पर्यटक चिंतामणी गावात जातील. तेथे ते कॉफी गार्डनला भेट देतील. यानंतर ते दुपारी उबुद रॉयल पॅलेसलाही भेट देऊ शकतील. बाली कॉफीसाठी प्रसिद्ध आहे, जगातील सर्वोत्तम कॉफी देखील येथे उपलब्ध आहे. टूरच्या चौथ्या दिवशी पर्यटकांना बाली सफारी आणि सी पार्कला भेट देता येणार आहे.
टूरच्या पाचव्या दिवशी, पर्यटक तानजुंग बेनोआ येथील टर्टल सेंचुरी बेटावर ग्लास बॉटम बोटच्या माध्यमातून सैर करु शकतील. यानंतर, ते बालीमधील प्रसिद्ध ठिकाण तानाह लॉट येथे सनसेटच्या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बाली विमानतळावरून प्रवासी लखनऊला जातील.
IRCTC च्या या 6 दिवस आणि पाच रात्रीच्या बाली टूर पॅकेजसाठी प्रवाशांकडून 1,05,900 रुपये आकारले जातील. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना फोर स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी एसी बस आणि अशा अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. या पॅकेजमध्ये एकूण 35 जागा असून 30 जूनपासून प्रवास सुरू होईल. यामध्ये तुम्ही एकूण 6 दिवस आणि 5 रात्री बाली प्रवास करू शकाल.