इन्कम टॅक्स रिटर्न भरणे ही सामान्यतः अवघड प्रक्रिया मानली जाते. ज्यांच्यासाठी आयटीआर भरणे अनिवार्य आहे, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना हे नकोसे वाटतं. तसंच ज्यांचं उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नाही त्यांच्यापैकी मोजकेच लोक आयटीआर फाइल करतात. मात्र, रिटर्न भरण्याचे फक्त फायदे आहेत. याचा एकही तोटा नाही.
बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था आयटीआर रिसिप्टला उत्पन्नाचा ठोस पुरावा मानतात. जर तुम्ही ITR भरत असाल आणि भविष्यात कार, कर्ज किंवा गृह कर्ज यासह कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत असाल तर ITR तुम्हाला यामध्ये खूप मदत करेल आणि तुम्हाला कर्ज सहज मिळेल.
अनेक देश व्हिसा देताना लोकांना त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा विचारतात. आयटीआर पावत्या तुमच्या उत्पन्नाचा भक्कम पुरावा आहेत. यामुळे तुम्हाला जिथे जायचे आहे त्या देशाच्या अधिकाऱ्यांना तुमच्या आर्थिक स्थितीची कल्पना येण्यास मदत होते. ITR दाखवल्यावर व्हिसा सहज उपलब्ध होतो.
शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही ITR खूप उपयुक्त आहे. यामध्ये नुकसान झाल्यास, तोटा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करुन इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. पुढील वर्षात कॅपिटल गेन झाल्यावर तोट्याला फायद्यामध्ये अॅडजस्ट केले जाईल आणि यामुळे तुम्हाला टॅक्स सूटचा फायदा मिळेल.
अनेकदा कंपन्या कर्मचाऱ्यांचा पगार टॅक्स स्लॅबच्या बाहेर असुनही उत्पन्नातून TDS कापतात. अशा परिस्थितीत, तुम्ही आयकर रिटर्न भरून तुमचा कापलेला टीडीएस सहज क्लेम करु शकता.
ITR पावती तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते, जी पत्त्याचा पुरावा म्हणून काम करू शकते. याशिवाय, ते तुमच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणूनही काम करते.