सोन्याचे दागिने घालायला प्रत्येकाला आवडतं. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परिस्थितीनुसार दागिने करत असतो. तुम्ही जेव्हा जेव्हा सोन्याचे दागिने खरेदी करता तेव्हा सोन्याच्या किमतीसोबत दागिन्यांचे मेकिंग चार्जेस देखील भरावे लागतात. एवढंच नाही तर यानंतरही तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. पण मेकिंग चार्ज कसा ठरवला जातो? दागिन्यांच्या एकूण किमतीमध्ये किती मेकिंग चार्ज असतो? याविषयी आपण जाणून घेऊया.
दागिन्यांची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यानुसार त्या दागिन्यांवर मेकिंग चार्ज आकारला जातो. सोने किलोमध्ये येते. नंतर, कारागीर ते वेगवेगळ्या दागिन्यांच्या रूपात तयार करतात. ज्यावर 10 ते 30 टक्के मेकिंग चार्ज लावला जाऊ शकतो. हे दागिन्यांवर किती बारीक काम केलं आहे यावर हे अवलंबून असते.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेकिंग चार्ज म्हणजे, सोन्याचे दागिने बनवण्यासाठी कारागिराची फी. डिझाईन जितकं जास्त बारीक आणि सुंदर असेल तितका मेकिंग चार्ज आकारला जातो. आणि डिझाइन जितके सोपे असेल तितके मेकिंग चार्ज कमी द्यावा लागतो.
मेकिंग चार्ज कसा आकारला जातो ते सोप्या पद्धतीने समजून घेऊ. समजा, तुम्ही सोन्याची अंगठी खरेदी केली. ज्यामध्ये 40 हजार रुपये किमतीचे सोने जोडलेले आहे. जर मेकिंग चार्ज 10 टक्के असेल तर याचा अर्थ तुम्हाला त्यावर 4,000 रुपये जास्त द्यावे लागतील. त्यानुसार त्या अंगठीची किंमत 44 हजार रुपये असेल.
मेकिंग चार्जेस हे सोन्याच्या वजनापेक्षा वेगळे असतात. ज्वेलरीच्या फायनल प्राइजमध्ये मेकिंग चार्जचा मोठा वाटा असतो. दागिन्यांनुसार मेकिंग चार्जेस निश्चित केले जातात.
दागिने खरेदी करताना तुम्हाला फारसे मेकिंग चार्जेस द्यावे लागू नये. असं तुम्हाला वाटत असेल. तर दागिन्यांच्या डिझाइनमध्ये जास्त डिझाइन मागू नका. तुम्ही जितके बारीक काम असलेले दागिने घ्याल तितके मेकिंग चार्ज वाढेल. मेकिंग चार्ज वाचवण्यासाठी साध्या डिझाइनचे दागिने खरेदी करा.
महत्त्वाचं म्हणजे, मेकिंग चार्ज कितीही जास्त असला, तरी जेव्हा तुम्ही ते सोनं परत विकता तेव्हा तुम्हाला त्याची योग्य किंमत मिळत नाही. तेव्हा मेकिंग चार्जचा समावेश केला जात नाही.