शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे.
अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.
दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे.