ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. खारघर इथं पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी दाखल झाले आहेत.
निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव असलेल्या अप्पासाहेब यांना वडिलांकडूनच निरूपणाचं बाळकडू मिळालं. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना याआधी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी उपक्रम राबवण्यात येतात.
नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३ मध्ये श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. त्यानतंर देशविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार झाला. रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपण बैठकांमधून केले जाते. नानासाहेब यांच्यानंतर निरूपणाचा हा वारसा अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे चालवला.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ ते २०२१ या काळात ३६ लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्षांची जोपासना श्री सदस्यांकडून होतेय. याशिवाय अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमसुद्धा राबवली जाते.