ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पिकांना वन्य प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे मचाण तयार करून शेतकरी आपल्या पिकांचं रक्षण करत असतो. शेतकरी आपल्या गरजेनुसार शेतात जुगाड करत असतो. वर्ध्यातील शेतकऱ्याच्या मुलानं केलेला असाच एक जुगाड सध्या चर्चेत आहे. कासरखेडा येथील शेतकरी पुत्र योगेश लिचडे यांनी अत्याधुनिक मचाण तयार केली आहे. या मचाणमध्ये आवश्यक सुविधा आहेत. ही अत्याधुनिक मचाण म्हणजे मिनी हाऊसच आहे. यामध्ये सोलर पॅनल बसवण्यात आलं आहे. या मचाणमध्ये सोलरच्या माध्यमातून पंखा, फोन चार्जिंग, प्रकाशाची सोय आहे. तसेच रेडिओसारखे मनोरंजनाचे साधनही आहे. 5 ते 6 फूट उंच आणि 550 किलो वजनाच्या या मचाणीत एकावेळी दोघेजण आरामात थांबू शकतात. तसेच मचाणला झुला देखील आहे. लोखंड आणि इतर आवश्यक साहित्याचा वापर करून ही मचाण तयार केली आहे. सध्या या अत्याधुनिक मचाणची पंचक्रोशित चर्चा असून लोक मचाण पाहण्यासाठी येत आहेत. शेतकऱ्यांना कमी खर्चात ही अत्याधुनिक मचाण बणवून देणार असल्याचं योगेशनं सांगितलं.