ऑनलाइनच्या जमान्यात सध्याच्या पिढीला महाराष्ट्राचा खरा इतिहास माहीत आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातच खाजगी शिक्षण संस्थांमुळे हायटेक शिक्षण ही संकल्पना सध्या भुरळ घालते आहे.
महाराष्ट्राच्या लढवय्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा विद्यार्थ्यांना विसर पडू नये, यासाठी चक्क शाळेचा राजवाडा बनवला आहे.
शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो. जर ज्ञानदान करणाऱ्या शाळांचा कायापालट झाला तर शिक्षणाला नवा आयाम मिळू शकतो.
समडोळी येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. रूपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे.
मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप देण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होती. मुलींनी पुन्हा शाळेत आनंददायी शिक्षणासाठी यावे म्हणून जुन्या वाड्यात भरणाऱ्या शाळेला राजवाड्याचं रूप देण्याचा निर्णय घेतला.
शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनीही चांगली साथ दिली आणि शाळेचा राजवाडा झाला.
मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम झाले आहे.
मुलींना भारतातील कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख व्हावी यासाठी भिंतींवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांची त्रिमिती चित्रे रेखाटली आहेत.
चित्रे रेखाटताना विद्यार्थिनींमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्यातून शिक्षण व्हावे, असा प्रयत्न केला आहे.
शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोयही उपलब्ध केली आहे.